शिंदखेडा येथील आण्णासाहेब एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांची गुणवत्तेचा ठसा उमठवत राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झेप.
✍️ यादवराव सावंत शिंदखेडा माझा न्युज
शिंदखेडा- शिक्षण क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील आपली बौद्धिक गुणवत्ता सिद्ध करू शकतात, याचा उत्तम प्रत्यय आण्णासाहेब एन. डी. मराठे शैक्षणिक संकुल, शिंदखेडा येथील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा दिला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेली उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता आठवी ) यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमठवत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
या परीक्षेत सार्थक जयवंत बोरसे, आदित्य महेंद्र पाटील, अदनानखान रईसखान पठाण या तीन विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा अत्यंत दर्जेदार असून विद्यार्थ्यांच्या वैचारिक, बौद्धिक आणि आकलनशक्तीची चाचणी घेणारी असते. अशा स्पर्धात्मक परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले यश सिद्ध करणे हे निश्चितच प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी शाळेतील गुणवत्तापूर्ण अध्यापन, पालकांचे मार्गदर्शन आणि स्वतःच्या सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री भाऊसाहेब साहेबरावजी मराठे व शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोल मराठे सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या अभिनंदन कार्यक्रम प्रसंगी श्री अमोल मराठे सर यांनी सांगितले की, “शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन केले. केवळ पुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांची वैचारिक जडणघडण करण्यावर आमचा भर राहिला आहे. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला आणि त्यांना यशाचे फळ मिळाले.”
विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरणार आहे. गुणवत्ता हिच खरी ओळख असून शाळेतील विद्यार्थ्यांनी याची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
या अभिनंदन कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक तसेच उपशिक्षक श्री.पी.बी.राजपूत उपस्थित होते.



















