अतिक्रमण हटाव मोहिमेद्वारे शिंदखेडा शहरातील मुख्य रस्ता मोकळा
शिंदखेडा नगरपंचायतीची धडक कारवाई; शेड, टपऱ्या व लोटगाड्या जप्त
✍️शिंदखेडा :माझा (संपादक यादवराव सावंत)

शिंदखेडा शहरातील वाहतूक सुरळीत राहावी, नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध व्हावे तसेच रस्त्यावरील वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी शिंदखेडा नगरपंचायतीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते भगवा चौक या मुख्य मार्गावर विशेष अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते तसेच इतर व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात आली.
सदर मोहीम माननीय मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पार पडली. यावेळी कार्यालयीन अधीक्षक सचिन वाघ, कर निरीक्षक गणेश पवार, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, आरोग्य निरीक्षक राजेंद्र चौधरी, लेखापाल दीप्लेश बागुल, लेखापरीक्षक शितल भोज, रवींद्र पाटील, अमरदीप गिरासे, दिनेश फुलपगारे, मनोज पाटील, अशोक भामरे, शाम भोई, अजय डोळवे, जयेश वाघ, नरेंद्र बडगुजर, पंडित माळी, राहुल पाटील, मच्छिंद्र सैंदाणे, विवेक डांगरीकर, वसीम शेख, हुसेन शेख, शकील शेख यांच्यासह नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मोहिमेदरम्यान शिंदखेडा नगरपंचायत भाजीपाला ओटे परिसरातील अतिक्रमणे हटवून परिसर मोकळा करण्यात आला. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अधिक सुलभ व नियोजनबद्ध जागा उपलब्ध झाली असून नागरिकांनाही खरेदीसाठी सोयीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते भगवा चौक परिसरातील अतिक्रमित शेड, टपऱ्या, लोटगाड्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यालगतच्या काही दुकानदारांनी दुकानासमोर वाढविलेली अनधिकृत शेड व अतिक्रमणे तात्काळ हटविण्याच्या सक्त सूचना नगरपंचायतीकडून देण्यात आल्या आहेत. संबंधितांना उद्यापर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली असून त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपंचायतीमार्फत जेसीबीच्या सहाय्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त ठेवणे, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ न देणे तसेच स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध शहर निर्मितीसाठी अशा प्रकारच्या मोहिमा पुढील काळातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



















