शिंदखेड्यातील सौ. सलिताबेन अशोकलाल शाह यांचे मृत्यूनंतर देहदान. सौ शाह यांचा देह हिरे मेडिकल कॉलेजला सुपुर्द

✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) : -शहरातील रथगल्ली येथील रहिवासी सौ. सलिताबेन अशोकलाल शाह यांचे 20 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता रथगल्ली शिंदखेडा येथे वयाच्या (वय ८१) वर्षी निधन झाले त्यांनी मृत्यूनंतर समाजोपयोगी ठरण्याचा अमूल्य आदर्श ठेवला आहे. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांचे पार्थिव शरीर धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात देहदानासाठी सुपूर्द केले.देहदान स्वीकृती कार्यक्रम धुळे येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पार पडला. या वेळी वैद्यकीय अधिष्ठाता विभागातील शरीररचना शास्त्र विभाग प्रमुख डॉ बशीर खान,प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रमोद पाटील,रमेश केदारे,संजय सोनवणे,व प्राध्यापक, डॉक्टर तसेच शाह कुटुंबातील सदस्य नातेवाईक उपस्थित होते.
कै.सौ सलिताबेन यांच्या मृत्यू पश्चात पती, दोन मुलं, दोन मुली, सूना, जावई नातवंड असा परिवार आहे. कै.सौ सलिताबेन ह्या शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्टचे माजी अध्यक्ष अशोक भाई शहा यांच्या पत्नी व महाराष्ट्रअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह प्रा. परेश शहा, व प्रा.व्रजेश शाह यांच्या त्या आई होत. संपूर्ण कुटूंबच समाजिक कार्यात अग्रेसर असून मयत शाह यांची वापी स्थित मोठी मुलगी प्रतिभा शाह यांनी वयाच्या 58 व्या वर्षी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्यावर शोध निबंध सादर करून डॉक्टरेट पदवी मिळवली आहे
डॉ शेख यांनी सांगितले की, “ एका देहदानातून भविष्यातील शेकडो डॉक्टर घडतात. त्यामुळे समाजाला आयुष्यभर उपयोगी ठरलेली व्यक्ती मृत्यूनंतरही शाश्वत ठरते.”
सौ. शाह यांच्या कुटुंबियांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “जिवंतपणी समाजोपयोगी कार्य करणं हे त्यांचं ब्रीद होतं. मृत्यूनंतरही समाजाला उपयोग व्हावा, अशी त्यांचीच इच्छा होती. आम्ही फक्त त्यांची इच्छापूर्ती केली आहे.”
या घटनेचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. विविध सामाजिक संस्थांनी शाह कुटुंबाचे अभिनंदन केले असून, “अधिकाधिक लोकांनी अशा उदात्त कार्यासाठी पुढे येऊन समाजासाठी देहदान परंपरा जोपासावी” असे आवाहन केले.









