गुरुकृपा कॉलनीतील ‘ओपन स्पेस’च्या विकासाचा मार्ग मोकळा; नगराध्यक्षांच्या पुढाकाराने स्वच्छता मोहिमेला प्रारंभ.
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत ):
येथील प्रभाग क्रमांक ९ मधील गुरुकृपा कॉलनीतील (गट क्र. ४२५) रहिवाशांच्या प्रलंबित मागण्यांची दखल घेत, शिंदखेडा नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रीमती.कलावती सुकलाल माळी व गटनेते.राकेशभाऊ माळी यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. आज दि. १६ एप्रिल रोजी कॉलनीतील खुल्या जागेच्या (Open Place) साफसफाईसाठी जे.सी.बी. पाचारण करून कामाचा शुभारंभ करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाला यश
गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील रस्ता आणि खुल्या जागेचा प्रश्न प्रलंबित होता. सामाजिक कार्यकर्ते श्री. उमाकांत रामराव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली १०-१२ दिवसांपूर्वीच कॉलनीतील रहिवाशांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना निवेदन दिले होते. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत नगरपंचायत प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत.
परिसराचा होणार कायापालट
गट क्र. ४२५ मधील या जागेवर मोठ्या प्रमाणात रानटी झाडे आणि झुडपे वाढली होती. ही जागा साफ करून तिथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे आणि नागरिकांसाठी बागेचे सुशोभीकरण करणे अशी रहिवाशांची मागणी आहे. आजपासून सुरू झालेल्या या कामामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
रहिवाशांनी मानले आभार
नगराध्यक्षा.श्रीमती.कलावती माळी आणि गटनेते राकेशभाऊ माळी यांनी शब्दाला जागून तातडीने कामाला सुरुवात केल्याबद्दल उमाकांत देसले यांच्यासह गुरुकृपा कॉलनीतील सर्व रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत. खुल्या जागेच्या स्वच्छतेनंतर आता रस्त्याचे कामही लवकरच मार्गी लागेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.









