राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार तळागाळा पर्यंत पोहोचविण्यासाठी करणार प्रयत्न –
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत विभाग व्यवस्था प्रमुख संजय चौधरी यांची माहिती
✍️
शिंदखेडा माझा( संपादक यादवराव सावंत )–राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या शताब्दी वर्षात संघ हा विशिष्ट धर्माविरुद्ध नसून सर्वधर्मसमभावाची संघाची भूमिका आहे हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम प्राधान्याने करण्यात येणार आहे. संघाबाबत समाजातील काही वर्गांमध्ये असलेला गैरसमज दूर करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे विभाग व्यवस्था प्रमुख संजय चौधरी यांनी शहरातील अशोक चित्र मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 1925 मध्ये करण्यात आली त्यानंतर संघावर तीन वेळेला बंदी आली. संघावर पहिली बंदी स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींची हत्या झाली त्यावेळी, दुसरी आणीबाणीच्या काळात तर तिसरी बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यात आला त्यावेळी लादण्यात आली. या बंदीमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कामात काही प्रमाणात अडथळा निर्माण झाला मात्र संघाने त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये आपली प्रतिमा निर्माण केली. संघाने भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,वनवासी कल्याण आश्रम,संस्कार भारती,इतिहास संकलन परिषद अशा विविध शाखा सुरू केल्या. या शाखांमार्फत एकल विद्यालय,फिरती विज्ञान प्रयोगशाळा,हिंदू जागरण, कौशल्य प्रशिक्षण असे जवळपास दोन लाखाच्या वर सेवा प्रकल्प राबविण्यात येत आहेत.
जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात येत्या विजयादशमीपासून सुरू होत असून या वर्षात स्वत्व, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण, स्वदेशीचा नारा या पंचसूत्रीवर भर देण्यात येणार आहे.यावेळी तालुका संघचालक सुजय पवार,तालुका संपर्क प्रमुख मयूर पवार ,जागरण प्रमुख राजेंद्र मराठे उपस्थित होते.














