*आण्णासाहेब एन. डी. मराठे शैक्षणिक संकुलात भक्ती रसात साजरा झाला वारी व रिंगण सोहळा.*. ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज संपादक यादवराव सावंत
शिंदखेडा- शहरातील आण्णासाहेब एन.डी. मराठे शैक्षणिक संकुलात आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला भक्तिमय वातावरणात वारी व रिंगण सोहळा साजरा झाला. आपल्या संस्कृतीत वारी ही एक आगळीवेगळी परंपरा आहे. शेकडो वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या या वारीने भक्ती, सेवा, समर्पण आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. हाच भक्तिभाव विद्यार्थ्यांच्या मनात रुजावा या उद्देशाने आण्णासाहेब एन. डी. मराठे विद्यालयात पारंपरिक वारी आणि रिंगण सादरीकरणाचा भावनिक सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिरसात साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात शाळेचा संपूर्ण परिसर वारकऱ्यांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. टाळ, मृदुंग, अभंग,भजनांचा गजर, भगव्या पताका, ज्ञानोबा-तुकाराम या नामस्मरणाचा गजर, पालखी सजावट आणि पारंपरिक वेशभूषा या सगळ्यांनी एक वेगळेच भक्तिमय वातावरण निर्माण केले. विठ्ठल व रखुमाई यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी व पालखी यात्रा या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते.
शाळेतील नर्सरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या वारीमध्ये भाग घेतला. विद्यार्थ्यांनी पारंपरिक भगव्या आणि पांढऱ्या रंगाच्या पोशाखात वारकऱ्यांचा वेष धारण केला होता. काही विद्यार्थ्यांनी टाळ आणि मृदुंग वाजवले, काहींनी अभंग गात भक्तिरस वाढवला, तर काही विद्यार्थ्यांनी रिंगण सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. वारीतून एकात्मता, भक्ती, सामाजिक समरसता, आणि शिस्त या मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना लाभली. रिंगण सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी पारंपरिक जीवनशैलीचा अनुभव घेतला.
विद्यार्थ्यांच्या वारी व पालखी यात्रा सादरीकरणाची शैक्षणिक आणि पालक वर्तुळातही स्तुतिसुमने उधळली गेली.
कार्यक्रमाचे निवेदन, अभंग-भजन गायन, वेशभूषा व पालखी सजावट यांमधून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, याची साक्षच या कार्यक्रमातून मिळाली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ मनोरंजन नव्हे तर परंपरेचे संवर्धन, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना आणि सामाजिक ऐक्य याचा अनुभव घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती. उपासना शुक्ला यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. महेंद्र माळी व श्री. सतीश बागुल यांनी प्रयत्न केले



















