शिंदखेडा शहरात विनापरवाना बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज, इ. लावून विद्रुपीकरण करणाऱ्यांना नगरपंचायतीचा दणका 👉 शहरात बॅनर लावताना नगरपंचायतीची परवानगी घ्या अन्यथा फौजदारी गुन्हा – मुख्याधिकारी श्री. फागणेकर

शिंदखेडा माझा (. संपादक यादवराव सावंत) :-
शिंदखेडा नगरपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या विनापरवाना बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज, इ. काढून टाकण्याची धडक मोहीम नगरपंचायत अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत हाती घेण्यात आलेली आहे. जाहिराती, शुभेच्छा नावाखाली विद्रुपीकरण करणाऱ्यांना चांगलाच दणका बसला आहे. मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 अंतर्गत विनापरवानगी बॅनर होर्डिंग्ज लावणे, इ. संदर्भात दाखल PIL 155/2011 बाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्णयानुसार सर्व महानगरपालिका/नगरपरिषदा व नगरपंचायतींना अनाधिकृत होर्डिंग्ज व बॅनरबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी देखिल शहरात बऱ्याचदा विनापरवानगी बॅनर लावलेले आढळून येतात. त्यानुषंगाने दि.१७/०९/२०२५ रोजी मुख्याधिकारी श्री. श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत शहरातील विनापरवाना बॅनर्स, पोस्टर्स, होर्डिंग्ज, इ. काढून टाकण्याची कारवाई करण्यात आलेली आहे. सदर कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभाग नोडल अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक श्री. राजेंद्र चौधरी, आरोग्य विभाग लिपिक श्री अबु हसन शेख, जयेश वाघ, अजय डोडवे, नाजीम मेहतर, राजेंद्र थोरात, विजय महाले, देविदास पाटोळे व समाधान पानपाटील यांच्या मार्फत करण्यात आली.
मालमत्ता विद्रुपीकरण कायदा 1995 अंतर्गत विनापरवानगी बॅनर होर्डिंग्ज लावणे, इ. संदर्भात दाखल PIL 155/2011 बाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या आदेशानानुसार शहरात बॅनर्स, पोस्टर्स व होर्डिंग्ज लावण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाची Online परवानगी घेणे आवश्यक आहे. विनापरवानगी बॅनर्स, पोस्टर्स व होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.पहिल्या दिवशी बरेच बॅनर्स ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे यापुढे शहरात बॅनर लावताना नगरपंचायत ची परवानगी घेणे आवश्यक आहे परवानगी ही प्रत्यक्ष नगरपंचायत किंवा नगरपंचायतच्या ऑनलाईन IWBP Portal वर करता येणार आहे. विनापरवानगी बॅनर लावल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. असे
श्री. श्रीकांत फागणेकर मुख्याधिकारी, शिंदखेडा नगरपंचायत यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



















