कामपूर येथे समाधान शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा
प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक यांचा नागरिकांशी थेट संवाद

शिंदखेडा, दि. ५ मार्च :
शिंदखेडा तालुक्यात आयोजित करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारीला गती दिली असून विखरण मंडळातील मौजे कामपूर येथे आज (दि.५ मार्च) नियोजन बैठक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी शिरपूर डॉ. शरद मंडलिक यांनी गावातील नागरिकांशी थेट संवाद साधत विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
या प्रसंगी तहसीलदार नितीन कुमार देवरे, मंडळ अधिकारी दीपक ईशी (विखरण मंडळ), तलाठी तसेच महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान नागरिकांना शासनाच्या विविध योजना, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि समाधान शिबिरामध्ये मिळणाऱ्या सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी शिबिराच्या आयोजनासाठी निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पाणी, बसण्याची व्यवस्था, नोंदणी प्रक्रिया आणि विविध विभागांचे काउंटर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी उपस्थित नागरिकांनीही आपल्या समस्या व शासकीय कामांबाबतच्या अडचणी मांडल्या. प्रशासनाच्या वतीने त्या समस्या समाधान शिबिराच्या माध्यमातून तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
दरम्यान, येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक यांनी केले.



















