वादळी वाऱ्यामुळे साक्री तालुक्यातील म्हसाळे वारात १०० मेगावॅट सौर प्रकल्प उद्ध्वस्त. 👉म्हसाळे शिवारात पाचशे एकरावरील ४ लाख सोलर प्लेट्सचे झाले नुकसान
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. म्हसाळे शिवारात या वादळाने ग्रीनको आणि सुझलॉन कंपन्यांच्या १०० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचा अक्षरशः विध्वंस केला आहे. म्हसाळे शिवारातील पाचशे एकर परिसरात विस्तारित असलेला सौर ऊर्जा प्रकल्प वादळामुळे जमीनदोस्त होऊन उद्ध्वस्त झाला आहे. यामध्ये जवळपास ४ लाख सोलर प्लेटचे नुकसान झाले आहे.
पावसामुळे शेती पिकांचेही झाले नुकसान
सुरुवातीला पाऊस नसल्यामुळे अडचणीत सापडलेल्या या पिकांवर आता परतीचा पाऊस आणि वादळी वाऱ्याने घाला घातला. पिके जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. माजी सरपंच गुलाब माळी आणि पोलिस पाटील सुनील वानखेडे यांनी प्रशासनाकडे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची मागणी केली.















