अवकाळी वादळाने डाबली धांदरणे, पाष्टे परिसरातील शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त. 👉 हरभरा-गहु,दादर पिके जमीनदोस्त.. 👉 शिंदखेडा तालुक्यातील पुर्व पट्टा भागातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका .
✍️शिंदखेडा माझा (यादवराव सावंत) :=
शिंदखेडा तालुक्यातील डाबली,धांदरणे,होळ, नरडाणा, वडली, विकवेल, वडोदे, पाष्टे व मुडावद शिवारात मंगळवारी (ता. २७) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व काही ठिकाणी बोराएवढी गारपीट झाल्याने काढणीस आलेल्या दादर, गहू व हरभरा, मका रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी डाबली,धांदरणे येथील सामाजिक कार्यकर्ते रामदादा पाटील सह शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत तलाठ्यांनी तहसील कार्यालयास प्राथमिक माहिती दिली आहे. डोळ्यांसमोर मेहनतीचे मोल वाहून गेले असुन डाबली,धांदरणे,होळ, नरडाणा,पाष्टे, मुडावद, परिसरात आलेल्या अचानक अवकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या कष्टांवर पाणी फेरले आहे. रात्रंदिवस घाम गाळून वाढवलेली हरभरा व गहु,दादर पिके क्षणात जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत.
काढणीच्या तोंडावर असलेले पीक वादळी वाऱ्यामुळे आडवे पडले, तर पावसाने सर्वस्व हिरावून नेले. लाखो रुपये खर्च करून उभे केलेले पीक नष्ट झाल्याने अनेक शेतकरी हतबल झाले आहेत. शेतात पडलेली पिके पाहून “आता जगायचे कसे?” असा सवाल शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसला आहे.
आधीच कर्जबाजारीपणा, वाढती महागाई आणि उत्पादन खर्चाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी या नैसर्गिक आपत्तीने पूर्णपणे खचून गेला आहे. या संकटाच्या काळात प्रशासन व शासनाने संवेदनशीलता दाखवून तात्काळ पंचनामा करावा व बाधित शेतकऱ्यांना त्वरित मदत व योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी आर्त मागणी डाबली,धांदरणे,पाष्टे परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.















