शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाने पत्रकार दिन केला साजरा
✍️शिंदखेडा माझा
(यादवराव सावंत) प्रतिनिधी . शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म दिनानिमित्त जितेंद्र मेखे यांच्या कार्यालयात प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार संघाचे अध्यक्ष व लोकमतचे पत्रकार भिका पाटील यांनी केली. त्यांनी सांगितले की, बाळशास्त्री जांभेकर (१८२५-१८८५) हे महाराष्ट्रातील पहिले आधुनिक पत्रकार आणि समाज सुधारक होते. त्यांनी अमर भारत आणि दर्पण या वर्तमानपत्रांद्वारे बालविवाहविरोध,अस्पृश्ता, अंधश्रद्धा आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर लेखन केले. जांभेकरांनी मराठी पत्रकारितेला व्यावसायिक आणि नैतिक स्वरूप दिले आणि ज्ञान,तर्कशक्ती व समाजोपयोगी विचारांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली. भिका पाटील यांनी थोडक्यात सांगितले की, बाळशास्त्री जांभेकर हे समाज सुधारक, विचारवंत आणि मराठी पत्रकारितेचे पितामह होते. यावेळी जेष्ठ पत्रकार व संस्थापक अध्यक्ष प्रा. दीपक माळी यांच्या हस्ते समाजहिताचे व परखड वृत्तांकन करणाऱ्या जेष्ठ सल्लागारांचे सन्मान करण्यात आला. यामध्ये सकाळचे पत्रकार विजयसिंग गिरासे, दैनिक दिव्य मराठी चे प्रा. अजय बोरदे, सकाळचे जितेंद्र मेखे, दैनिक पुण्यनगरी चे परेश शाह,शिंदखेडा माझा न्युज संपादक यादवराव सावंत आदींचा गौरव करण्यात आला. पत्रकार संघाचे सल्लागार प्रा जी पी शास्त्री व प्रा सतीश पाटील यांनी पत्रकारांना पुण्याहून दूरध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या समाजोपयोगी कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानास अभिवादन केले.















