शिंदखेडा शहरातील पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप; 👉 1मे पासून सुभाष माळीचे आमरण उपोषणाचा इशारा ✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)

👉सविस्तर वृत्त असे कि,
शिंदखेडा शहरातील 21 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जबाबदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी नगर पंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देण्यात आले असून, येत्या 1 मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे. माजी पंचायत समिती सदस्य श्री. सुभाष नागों माळी आणि नगरसेविका सौ रजुबाई सुभाष माळी यांनी नगराध्यक्षा कलावती माळी व मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत.महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 16 ऑक्टोबर 2016 रोजी या योजनेस प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर 27 एप्रिल 2017 रोजी तेजस कंस्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., पुणे यांना कामाचा कार्यादेश देण्यात आला होता. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, 14 ऑगस्ट 2025 रोजी प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार प्राधान्याने कामे पूर्ण करून पाणीपुरवठ्याची प्रत्यक्ष चाचणी घेण्याचे आणि शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, नव्याने देण्यात आलेल्या नळ कनेक्शनद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित कंत्राटदाराला नोटिसा देण्यात आल्या असल्या तरी त्या अनुषंगाने काम पूर्ण करून घेण्यात आलेले नाही, अशीही तक्रार करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर, “योजनेतील भ्रष्टाचाराबाबत जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास 1 मे 2026 रोजी नगर पंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक यांनाही सादर करण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे शिंदखेडा शहरात पुन्हा एकदा पाणीपुरवठा योजनेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

















