राष्ट्र विकास तथा संस्कृती संवर्धनासाठी युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण
प्राचार्य संजीव गिरासे : 👉म्हसदीत माय भारत क्विझसाठी सामूहिक नोंदणी.
✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत
म्हसदी:- भारतीय संस्कृतीक परंपरा जगात अलौकिक आहेत. मानवी जीवन सुकर तथा सांघिक भावनेने जगण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या सांस्कृतिक परंपरा आहेत. कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था, सामाजिक न्याय, धार्मिक व आध्यात्मिक अधिष्ठान, सर्वधर्मसमभाव, बंधुता अशा विविध अंगी सांस्कृतिक परंपरांचे जतन करणे आज काळाची गरज ठरत आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी समाजातील विविध पातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे. राष्ट्राच्या विकास तथा सांस्कृतिक संवर्धन करण्यासाठी युवकांची सांघिक भूमिका महत्त्वाची ठरेल, असे मत प्राचार्य डॉ. संजीव गिरासे यांनी व्यक्त केले.
म्हसदी येथील आदिशक्ती धनदाई माता शिक्षण प्रसारक संस्थेच्या स्व. आण्णासाहेब आर. डी. देवरे कला व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्थानिक एककातर्फे ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत क्विजमध्ये महाविद्यालयातील अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी सामूहिक नोंदणी मोहीम उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. संजीव गिरासे बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे धुळे जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. हेमंतकुमार पाटील, माझी रा से यो समन्वयक डॉ. वाल्मीक आढावे, डॉ. संदीप नांद्रे डॉ. विशाल शिंदे, डॉ. भाऊसाहेब काकडे, डॉ. विठ्ठल साळुंखे, डॉ. वनिता पवार, प्रा. देविदास भामरे, कार्यालय अधीक्षक अरुण पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रादेशिक संचालक, राष्ट्रीय सेवा योजना प्रादेशिक संचालनालय, पुणे आणि युवा कार्य व क्रीडा मंत्रालय भारत सरकार तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026’ या उपक्रमांतर्गत माय भारत क्विझ चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रास्ताविकातून रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. बाबासाहेब मोताळे यांनी दिली. संस्थेचे अध्यक्ष नाक कान घसा शल्य चिकित्सक डॉ. संजयकुमार देवरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. अशा उपक्रमांची सध्या गरज असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले.यावेळी माय भारत क्विझ मध्ये स्वयंसेवकांनी सहभाग कसा नोंदवावा या संदर्भात राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. हेमंत नांद्रे यांनी स्वयंसेवकांना सविस्तर माहिती दिली. यावेळी रासेयो धुळे जिल्हा समन्वयक डॉ. हेमंतकुमार पाटील यांच्या हस्ते क्यू आर कोड च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. महाविद्यालयातून पहिल्याच दिवशी ७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. सदर उपक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. बाबासाहेब मोताळे, डॉ. वनिता पवार, डॉ. हेमंत नांद्रे आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी केले.















