भडणे गावात विजयी उमेदवारावर तलवारीने हल्ला. 👉शिंदखेडा पोलिस ठाण्यात परस्पराविरूध्द गुन्हे दाखल.
✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील विवेकानंद सहकारी दूध संस्थेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रजासताक दिनी पराभवाचा राग मनात धरून विजयी उमेदवारावर भरदिवसा तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत फिर्यादी गंभीर जखमी झाले असून शिंदखेडा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी मनोज वसंत निकुम (वय ३५, रा. भडणे) हे विवेकानंद सहकारी दूध संस्थेच्या निवडणुकीत आरोपींच्या विरोधी पॅनलमधून उभे होते आणि ते निवडूनही आले. १० जणांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी संशयित आरोपी १) तानाजी वामन देसले २) गिरीष वामन देसले ३) संभाजी वामन देसले ४) संजय भगवान देसले ५) किरण संजय देसले (सर्व रा. भडणे, ता. शिंदखेडा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३/५, भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ आणि महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (३) (१) व १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा अधिक तपास शिंदखेडा पोलिस स्टेशनचे सहायक निरीक्षक हनुमान गायकवाड करत आहेत. दरम्यान या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दुसरी घटनाः लाकडी दांडक्याने नदी परिसरात मारहाण
याच वादाच्या पार्श्वभूमीवर चेतन धनराज पाटील (वय २३) यांनी दुसरी फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या आरोपानुसार, १) किरण परबतसिंग गिरासे, २) मनोज वसंत निकम, ३) प्रथमेश छोटू लोहार, ४) अतुल दिलीप वाघ आणि ५) जितेंद्र नारायणसिंग गिरासे या पाच जणांनी त्यांना नदी परिसरात गाठून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी पाच जणांवर BNS कलम ११८ (१), १८९(२), १९१(२), १९० व ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
निवडणूक जिंकल्याचा राग असल्याने केला हल्ला
आपल्या विरुद्ध पॅनलमध्ये उभे राहून निवडणूक जिंकल्याचा राग आरोपींच्या मनात होता. २६ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मनोज निकुम हे त्यांच्या घराच्या अंगणात असताना आरोपींनी संगनमताने तिथे येऊन वाद घालण्यास सुरुवात केली.
आरोपी तानाजी वामन देसले याने मनोज निकुम यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यावर तलवारीने वार केला. निकुम यांनी तो वार चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र तलवार त्यांच्या डाव्या बाजूच्या कमरेखालील मागील भागावर लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान घटनेची माहिती कळताच शिंदखेडा पोलिस घटनस्थळी दाखल झाले होते. या घटनेची तत्काळ पोलिस प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली आहे.















