दोंडाईच्यात स्वोद्धारकचे माजी विद्यार्थी 44 वर्षांनी स्नेहमेळाव्यात आले एकत्र. ✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत)
दोंडाईचा येथील स्वोध्दारक विद्यार्थी संस्था संचालित आर. डी.एम.पी.हायस्कूल व डी आर.बी.ओ.डी हायस्कूल येथे 1981 वर्षी 10 वीत व 1983 वर्षी 12 वीत शिक्षण घेतलेल्या काही मित्र एका समारंभात एकत्र आले असता त्यांच्या मनात स्नेहमेळावा (गेट टुगेदरची) आयोजनाविषयी चर्चा झाली आणि सर्व मित्रांना एका माळेत गुंफून “स्नेहमेळावा मैत्रीचा” घडवून आणायचा संकल्प केला. त्यानुसार काही मित्रांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष रूपरेषा आखायला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या वापर करून सर्व मित्रांशी संपर्क करून 18 जानेवारी रविवार ही मेळाव्याची तारीख ठरली. सर्व मित्रांचे नाव आणि मोबाईल नंबर यादी करुन सर्वांना संपर्क करणे, नियोजन, कार्यक्रमाची रूपरेषा आणि कार्यक्रम कायम स्मरणात राहिल असा झाला पाहिजे, यासाठी विशेष तयारी सुरू केली आणि याच संकल्पनेतून दोंडाईचा येथील “सौरभ लॉंन्स” येथे सर्व मित्रांसोबत व ज्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली शिकलो त्यांच्या उपस्थितीत सदर “स्नेहमेळाव्याचे” आयोजन घडवून आणण्याचा योग आला. दि.18 जानेवारी रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंत स्थानिक व विविध ठिकाणावरुन आलेले सर्व मित्र जमायला सुरुवात झाली व सर्व गुरुजनांना सन्मांपूर्वक कार्यक्रम स्थळी आणले गेले. सर्व विद्यार्थ्यांनी गुरुजनांचा चरणस्पर्श करुन गुरुवंदन केले. गुरुजनांविषयी आदर व एक आगळा वेगळा आनंद, स्नेहभाव आणि ती मैत्री प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिवसभर चमकत राहिली. अगदी भूतकाळात गेल्यासारखे वाटले. उपस्थित गुरुजनांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. के. पी. गिरासे हे होते यावेळी व्यासपीठावर श्री. एस. आर. सोनवणे, श्री. पी.एल. राजपूत, श्री. व्ही.आर. आडगाळे, श्री. के.एस. धनगर, श्री. पी. यू. पवार, श्री. बद्री बांगड, श्री. नरेंद्र शहा, श्री. जे.जे.शहा, श्री. एस.जी.पाटील, श्री. एम.एन. चौधरी, श्री. के. एस. धनगर, श्री. पी टी. तलवारे व श्री. रमेश सोनार आदी गुरुजन वर्ग व सभागृहात जमलेले मित्र उपस्थित होते. कार्यक्रमात शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून गुरुजनांचा सन्मान करण्यात आला तर प्रकृती बरी नसलेले श्री. के. बी. मालपूरकर यांचा घरी जाऊन सन्मान करण्यात आला. तसेच पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या 14 वर्षाआतील विद्यार्थ्यांच्या बॅडमिंटन स्पर्धेत दोंडाईचा येथील सुवर्णपदक विजेता चि.हिमांशू प्रशांत चौधरी याचा भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व मित्रांनी गत आठवनींना उजाळा देतांना गुरुजनांचे आणि विद्यालयाचे ऋण व्यक्त करुन आपला परीचय करून दिला व आपल्या जीवनात केलेली प्रगती तसेच परीवाराविषयी सविस्तर माहिती दिली. यानंतर गुरुजनांनी विविध क्षेत्रात नोकरी व उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्नेहभोजन
झाल्यावर दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी जमलेल्या मित्रांनी आपल्या अंगी असलेल्या विविध कला सादर केल्या. यानंतर सर्वानुमते भविष्यात दरवर्षी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्याचे ठरले. यापुढे संस्था व शाळेच्या विकासात योगदान देणे, शाळेतील गरीव व गरजू विद्यार्थ्यांच्य शैक्षणिक विकासासाठी मदत करणे, शाळेत विद्यार्थ्यांसाठी मुल्यशिक्षणाचे उपक्रम राबवणे तसेच 10वी, 12 वी व पदवी वर्गातील गुणवंत विद्यार्थी तसेच क्रीडा व अन्य क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, परीसरात वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनाचे उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. शेवटी सामूहिक राष्ट्रगिताने स्नेहमेळाव्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे यांनी केले, सूत्रसंचलन , सेवानिवृत्त विभागीय वन अधिकारी श्री. संजय पाटील, यांनी केले. उपस्थित सर्व शिक्षक आणि कार्यक्रमासाठी लांबून आलेल्या सर्व मित्रांचे आभार श्री. भगवान भदाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विठ्ठल रामोळे, संजय चौधरी, सुनिल वानखेडे, जितेंद्र गिरासे, महेंद्र पाटील, शिवाजी पाटील, मोहन परदेशी यांनी परिश्रम घेतले.















