शिंदखेडा तालुक्यात सेवा पंधरवाडा व समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ 
शिंदखेडा माझा( संपादक यादवराव सावंत)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ आज (१७ सप्टेंबर) राज्यभर होत असून या अभियानाला शिंदखेडा तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाची औपचारिक सुरुवात होणार आहे, तर तालुक्यातील खलाणे ग्रामपंचायतीत आयोजित विशेष ग्रामसभेला जिल्ह्याचे पालकमंत्री व पणन मंत्री जयकुमार रावल उपस्थित राहणार आहेत. या अभियानात राज्यभरातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदा सहभागी होणार असून ९० दिवस चालणाऱ्या स्पर्धेत विजेत्या संस्थांना तब्बल २९० कोटी रुपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत. यासाठी शिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायतींमध्ये एकाचवेळी ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत.सोबत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान 17 सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आले आहे त्याचाही शुभारंभ आजपासून होणार आहे ग्रामसभांमध्ये प्रवीण प्रशिक्षकांकडून
अभियानाची सविस्तर माहिती दिली जाणार असून सर्व कार्यवाहीचे छायाचित्रण व व्हिडिओ चित्रण करण्यात येणार आहे. ज्या ग्रामपंचायतींवर प्रशासक आहेत, त्या ठिकाणी तलाठी किंवा शाळेचे मुख्याध्यापक सचिव म्हणून ग्रामसभा घेतील. तालुक्यातील १२३ पैकी २४ ग्रामपंचायतींवर प्रशासक कार्यरत आहेत.
या अभियानाचा उद्देश प्रशासन लोकाभिमुख व कार्यक्षम करणे, स्वनिधी, सीएसआर व लोकवर्गणीतून आर्थिक स्वावलंबन साधणे, पाणी व्यवस्थापन,स्वच्छता, पर्यावरण संरक्षणाला बळ देणे,शाळा-अंगणवाडी-आरोग्य केंद्रांचे सशक्तीकरण करणे तसेच रोजगार निर्मिती व सामाजिक समता साधणे हा आहे. लोक सहभाग व श्रमदानातून विकासाला लोकचळवळीचे रूप देणे हा या अभियानाचा मुख्य हेतू असल्याचे गटविकास अधिकारी रमेश नेतनराव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला ग्रामविस्तार अधिकारी (ग्रामपंचायत)के. एन. वाघ, जी. के. वेताळे व आर. बी. निकुंभे उपस्थित होते.





















