धीर सोडू नका, सरकार तुमच्या पाठीशी पालकमंत्री जयकुमार रावल यांचा शेतकऱ्यांना दिलासा.
✍️ शिंदखेडा माझा (यादवराव सावंत )
शनिवारी (ता. २७) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
शिंदखेडा तालुक्यातील काही भागात केळी, पपई, कापूस, ऊस, मका, मिरची आदी पिके जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, रविवारी (ता. २८) सकाळी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी तालुक्यातील लोहगाव, वसमाने व तापी काठावरील नुकसानग्रस्त गावांना भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
शनिवारी झालेल्या पावसाने नुकसान झाले आहे हे कळताच पालकमंत्री रावल यांनी जिल्हा प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. मंत्री रावल म्हणाले, वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, ही परिस्थिती गंभीर आहे. केळी, पपई, ऊस, कापूस, मका ही नगदी पिके जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या कठीण प्रसंगात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. जिल्ह्यात ज्या भागात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत ‘संकट मोठे असले तरी सरकार तुमच्यासोबत आहे. लवकरच मदत जाहीर करण्यात येईल’, असे आश्वासन दिले. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप, तहसीलदार संभाजी पाटील, तालुका कृषी अधिकारी देवेंद्र नागरे, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, माजी सभापती जिजाबराव सोनवणे आदींसह महसूल व कृषी मंडल अधिकारी, तलाठी, कृषी सहायक उपस्थित होते.















